पुणे : फेंगाल चक्रीवादळामुळे दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याचे दिसून आले. मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, कोल्हापूर, नवी मुंबईसह कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाने दणका दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकणात अंबा आणि काजूचे पिक संकटात आले आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याकडून आज १० जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात आज अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहे. रविवारपर्यंत महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
फेंजल चक्रीवादळामुळे नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यांच्या काही भागात गुरुवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्यामुळे थंडी गायब झाली आहे. गुरूवारी मुंबईतील सांताक्रूज येथे राज्यातील उच्चांकी ३७.३ अंश तापमानाची नोंद झाली. आज राज्यात अनेक ठिकाणी कमान आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी ढगाळ हवामान राहू शकते. तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका हळूहळू वाढत आहे. गुरुवारी हरियाणातील ‘हिसार’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पंजाब, हरियाणासह उत्तरेकडे थंडी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात रविवारनंतर थंडीचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.