मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६८ वा महापरिनिर्वाण दिन आहे. महापरिनिर्वाण दिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे येत असतात. आजही ६८ व्या महापरिनिर्वाण दिननिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून चैत्यभूमीवर जनसागर उसळला आहे.
समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भीमराव रामजी आंबेडकर यांनी ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला होता. त्यानंतर 6 डिसेंबर हा दिवस भारतात महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ डिसेंबरपासून लाखो अनुयायी मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी परिसरात दाखल झाले आहेत. आज लाखो अनुयायी हे चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करत बाबासाहेबांना अभिवादन करणार आहेत