मुंबई : भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि.5) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गेल्या पाच वर्षांपासून भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि देवेंद्र फडणवीसांचे चाहते ज्या क्षणाची वाट पाहत होते. तो क्षण अखेर सत्यात उतरला. हा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण, सध्या चर्चा आहे ती अजित पवार यांच्या बंगल्याची.
राज्याचा मुख्यमंत्री कोणीही असो त्यांना ‘वर्षा’ हा सरकारी बंगला दिला जातो. तर उपमुख्यमंत्री यांना ‘सागर’ बंगला दिला जातो. तर सरकार स्थापनेनंतर खातेवाटप झाल्यानंतर मंत्र्यांना शासकीय घरे दिली जातात. या शासकीय घरांना नावेदेखील देण्यात आली आहेत. मात्र, पद गेल्यानंतर ते बंगलेदेखील सोडावे लागतात. पण, गेल्या 16 वर्षांपासून अजित पवार हे देवगिरी या सरकारी बंगल्यात राहत आहेत.
सर्वात पहिलं 1999 मध्ये अजित पवारांनी या ‘देवगिरी’ बंगल्यात प्रवेश केला ते आजतागायत अजित पवार यांचे निवासस्थान तेच आहे. 1999 साली काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचे सरकार होतं तेव्हा अजित पवार देवगिरी बंगल्यात राहायला गेले होते.
सत्ता गेली पदं बदलली पण…
अजित पवारांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आत्तापर्यंत अजित पवार यांच्याकडे विविध पदांचा कार्यभार सोपवण्यात आला. सत्ता गेली, पद बदललं तरीदेखील त्यांचं शासकीय निवासस्थान मात्र कायम राहिलं. पण, आता पुन्हा एकदा ते राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा देवगिरी मिळणार की अन्य कोणता बंगला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
2014 मध्ये सुधीर मुनगंटीवार यांना मिळाला होता बंगला
अजित पवार हे 1999 ते 2014 पर्यंत या बंगल्यात राहत होते. पण, 2014 मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आले. तेव्हा सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री होते, त्यावेळी मात्र हा बंगला त्यांना देण्यात आला होता. मात्र, 2019 मध्ये जेव्हा पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार आले आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा ते पुन्हा एकदा देवगिरी बंगल्यात राहण्यासाठी आले.