राजगुरुनगर : खेड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश ए. एस. सय्यद यांच्या सातरकस्थळ येथील देव्हरकर कॉलनीतील ज्ञानदीप पंतस्मृती या बंद बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील रोख रक्कम, सोने आणि महत्त्वाची कागदपत्रे असा एकूण २ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या वेळी चोरट्यांनी तर थेट जिल्हा न्यायाधीशांच्याच घरी चोरी केल्याने गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
याबाबत न्यायालयातील कर्मचारी रोहिदास पंडित चव्हाण यांनी खेड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. मंगळवारी (दि.३) रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान जिल्हा न्यायाधीश सय्यद राहत असलेला सातरकस्थळ येथील ज्ञानदीप बंगला बंद असल्याचे निदर्शनास आल्यावर चोरट्यांनी याचा बंगल्यात चोरी केली. यापूर्वी दोन-तीन दिवस परिसरातील जागरूक नागरिकांमुळे चोरीचे दोन-तीन प्रकार फसले होते.
जिल्हा न्यायाधीशांचा बंगला बंद असल्याचे लक्षात आल्यावर चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडला व घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील १५ हजार रुपये रोख, सव्वादोन लाखांचे तीन तोळे सोने व काही महत्त्वाची कागदपत्रे चोरली. या प्रकरणात खेड पोलिस स्टेशनच्या वतीने अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातरकस्थळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनामध्ये वाढ होताना दिसत आहे. दोन चार दिवसांपासून चोरटे चोरी करण्याचे प्रयत्न करत होते. मात्र, सजग नागरिकांमुळे चोरट्यांचा चोरीचा डाव दोन वेळा फसला. यामध्ये एक वेळ तर एका पोलिस कर्मचाऱ्यांच्याच घरी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला होता. याबाबत खेड पोलिस स्टेशनमध्ये तक्रारदेखील दाखल करण्यात आली होती. या तक्रारी पोलिसांनी गांभीर्याने घेऊन परिसरात गस्त वाढवली असती तर जिल्हा न्यायाधीशांच्या घरची चोरी कदाचित टळली असती, अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये होताना दिसत आहे.