भोकरदन : सैलानी बाबांच्या दर्ग्यातून दर्शन घेऊन परत येत असताना दोघा भामट्यांनी कमी भावात सोन्याचे नाणे देण्याचे आमिष दाखवत बांधकाम मजूराकडून दोन लाख रुपये उकळून गंडा घातल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी दानापूर (ता. भोकरदन) येथे घडली. याप्रकरणी फिर्याद उशिरा आल्यानंतर काल मंगळवारी (दि.३) रात्री भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
देवमुर्ती (ता. जालना) येथील बांधकामाच्या सेंट्रींगचे काम करणारे भगवान गंगाराम पुंड हे त्यांचे मित्र भालेराव यांच्यासमवेत २५ ऑक्टोबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबांच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते दोघे दर्ग्याजवळ बसले असता दोघा अनोळखी इसम त्यांच्याकडे आले. त्यांनी फिर्यादी यांची गोड बोलून माहिती काढली आणि आमच्याकडे सोन्याचे नाणे आहे. ते आम्ही कमी भावाने विकत आहोत, असे त्यांना सांगितले. तसेच तुम्हाला पाहिजे असल्यास आणून देतो, असे म्हणून दोघांनी सदर मजूराचा विश्वास संपादन केला. २७ ऑक्टोबर रोजी दोघापैकी एकाने भगवान पुंड यांना व्हाट्सअप वर सोन्याच्या नाण्याचा फोटो पाठवला. सदर नाण्याची खात्री करण्यासाठी पुंड व त्यांचा मित्र भालेराव यांना ३० ऑक्टोबर रोजी कदीर व मस्तान या दोघांनी दानापूर येथे बोलावून एक सोन्याचे नाणे दिले व त्याची खात्री करून परत करण्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी पुंड व त्यांचा मित्र दानापूर येथे गेले असता कदीर व मस्तान यांनी दोन लाख रूपये व सोन्याचे नाणे घेऊन पसार झाले होते.