नागपूर : हिंगणघाट तालुक्यात दोघांनी घरफोडी केली. यातील एकाला नागपूर शहरात अटक करण्यात आली. पंकज बंडूजी सतरामवार (२४, रा. गल्ली नंबर १, विटाभट्टी चौक, यशोधरानगर), अटकेतील आरोपीचे नाव आहे, तर हर्ष छोटू डेहरिया (रा. शांतीनगर) हा फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून ३५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ५ चे पथक पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विनोबा भावेनगर येथे पाहणी केली असता येथे आरोपी पंकज सतरामवार हा संशयितरीत्या फिरत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याचा साथीदार हर्ष डेहरिया याच्यासोबत मिळून ३१ ऑक्टोबरला हिंगणघाट येथे घरफोडी केल्याची कबुली दिली.
चोरीचे दागिने त्यांनी एका सोनाराला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी हिंगणघाट पोलिसांकडे चोरीसंदर्भात चौकशी केली असता आरोपींनी सुरेश श्रीरामजी धोंगडे (४७, रा. शाहलंगडी रोड, संत ज्ञानेश्वर वॉर्ड, हिंगणघाट, जि. वर्धा) यांच्या घरी चोरी केल्याची माहिती दिली. अटकेतील आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी ३५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करत आरोपीला हिंगणघाट पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.