पुणे : राज्यस्तरावरून साक्षरता वर्गाची पाहणी करण्यासाठी शिक्षण संचालनालयातील अधिकारी क्षेत्रीय कार्यालय, जिल्हा, तालुका आणि निवडक शाळांना भेटी देऊन आढावा घेणार आहेत. त्याबाबत शिक्षण संचालनालय (योजना) पुणे यांच्या अंतर्गत आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
या बैठकांमधून दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा, तालुका व शाळास्तरावरील झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला जाईल. केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा, तालुका व शाळास्तरावर केलेल्या पूर्वतयारीचा, उल्लास मेळावा पूर्वतयारी व कार्यवाहीचा तसेच शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी योजना संचालनालयातील अधिकारी जिल्हा, तालुका कार्यालयांना आणि निवडक शाळांना भेटी देणार आहेत.
भेटीदरम्यान संबंधित अधिकारी (योजना) कार्यालय, गट शिक्षणाधिकारी कार्यालय, शाळा तसेच उल्लास – नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सुरू असलेले वर्ग यांना भेटी देऊन असाक्षर व स्वयंसेवक यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच शाळांमधून विविध शासकीय योजनांची सुरू असलेल्या अंमलबजावणीची पाहणी करून त्याची माहिती घेणार आहेत. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी संचालनालय स्तरावरून भेटी देण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत जिल्हा कार्यालयातील वर्ग-१ किंवा वर्ग-२ दर्जाचे अधिकारी दौऱ्यात पूर्ण वेळ उपलब्ध असणार आहेत, असे प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.