मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेनेचा एक साधा शाखाप्रमुख ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा एकनाथ शिंदे यांचा प्रवास स्वप्नवत असाच म्हणावा लागेल.
एकनाथ शिंदे यांची राजकारणातील सुरुवात शिवसेनेतील साधा शिवसैनिक आणि शाखाप्रमुख म्हणूनच झाली होती. मात्र, आता तेच एकनाथ शिंदे हे आज निवडणूक आयोग, न्यायालय आणि जनमताच्या कौलानुसार खरे शिवसेना पक्षप्रमुख ठरले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचा उल्लेख गद्दार असा केला होता. त्यांना कुत्सितपणे रिक्षावाला म्हणून हिणवले होते. मात्र, त्याच एकनाथ शिंदे यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त आमदार निवडून आणत खरी शिवसेना कोणाची, हे एकप्रकारे ठाकरेंना दाखवून दिले आहे.
एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द
- सुरूवातीच्या काळात एकनाथ शिंदे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या छायेत वाढले.
- 1980 च्या दशकात शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारणाला सुरुवात·
- 1984 साली किसननगर येथे शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती. शिवसैनिक या नात्याने अनेक आंदोलनांमध्ये सहभाग. सीमा आंदोलनात तुरुंगवासही भोगला·
- 1997 साली पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले·
- सन 2001 मध्ये सभागृहनेतेपदी निवड. सलग तीन वर्षे पद सांभाळले·
- सन 2004 मध्ये त्यावेळच्या ठाणे विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून विजयी·
- सन 2005 मध्ये शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती.
- सन 2009 मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघातून पुन्हा आमदार·
- सन 2014 साली विजयाची हॅटट्रिक. विरोधी पक्षनेतेपदी निवड·
- डिसेंबर 2014 मध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ. एमएसआरडीसीचे मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला·
- जानेवारी 2019 मध्ये नगरविकास मंत्रिपदी निवड.
- सन 2022 ते 2024 मुख्यमंत्री, नगरविकास मंत्रीपद