कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील चिमगाव येथील सख्ख्या बहिण भावांचा मंगळवारी सायंकाळी विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. श्रीयांश रणजीत आंगज (वय-५) आणि काव्य रणजीत आंगज (वय-८) अशी मृत्यू झालेल्या दोघां चिमुकल्यांची नावे आहेत. मंगळवारपासून दोन्ही भावंडांना उलट्या आणि मळमळ असा त्रास जाणवत होता.
मुरगुड आणि कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार झाले. पण त्यांनी उपचाराला योग्य प्रतिसाद दिला नसल्याने दोघांचीही प्राणज्योत मालावली. या घटनेची नोंद कोल्हापूर सीपीआर चौकीत झाली असून, या दोघांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
चिमगाव येथे त्या मुलावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर मुलगी काव्याला देखील त्रास जाणवू लागला. तिला सुद्ध सायंकाळी मुरगूड येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. पण ती उपचारांना प्रतिसाद देत नव्हती, त्यामुळे तिला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या रुग्णालयात देखील तिची प्रतिकृती खालावत गेली आणि तिचा मृत्यू झाला.
घटनेमध्ये या दोन्ही मुलांची आई यांना देखील काही प्रमाणावर मळमळ, उलटीचा त्रास जाणवत असल्याची माहिती आहे. चिमगावमधील श्रीयांश आणि काव्या यांच्या आकस्मिक मृत्यूने चिमगाववर शोककळा पसरली आहे. परिसरात या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू होती.