मुंबई: ठाणे पोलिसांनी दाखल केलेल्या दोन हजार कोटींच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट आणि तस्करीच्या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर लोकप्रिय अभिनेत्री ममता कुलकर्णी भारतात परतली आहे. सुमारे २५ वर्षांनी मुंबईत परतल्यानंतर भावुक झालेल्या ममता कुलकर्णीने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे.
९० च्या दशकात प्रचंड लोकप्रिय झालेली ममता कुलकर्णी २००० साली भारताबाहेर गेली होती. दीर्घकाळापासून परदेशात वास्तव्यास असणारी ममता २५ वर्षांनी मुंबईत परतल्यानंतर भावुक झाली. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून ती सध्या मुंबईत असल्याची चर्चा आहे. अलीकडेच तिचा ‘करण अर्जुन’ हा सिनेमा रिलीज झाला आहे, त्यादरम्यान ममता भारतात परतली आहे.
ममताने तिच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केलेल्या सेल्फी व्हिडीओत ती भारतात परतण्याबद्दल भाष्य करताना दिसली, ‘नमस्कार मित्रांनो, मी ममता कुलकर्णी. मी आताच भारतात परतले… २५ वर्षांनी मुंबईमध्ये परतली आहे. मी खरोखर भारावून गेले आहे आणि मला ते कसे व्यक्त करावे हे माहीत नाही. मी भावनिक आहे. खरंतर, फ्लाइट लँड झाल्यावर आणि फ्लाइट लँड होण्यापूर्वी, मी माझ्या डाव्या उजव्या बाजूला पाहत होते. इतक्या वर्षांनी माझा देश मी वरून पाहिला आणि मी भावुक झाले, माझ्या डोळ्यांत पाणी आले. मी आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळाच्या बाहेर पाय ठेवला आणि मी पुन्हा खूप भारावून गेले होते,’ असे तिने व्हिडीओमध्ये नमूद केले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित तिच्या विरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हा रद्द केला आहे. त्यानंतर ती भारतात परतल्याचे बोलले जाते. ममताने राम लखन, वक्त हमारा है, क्रांतिवीर, करण-अर्जुन, सबसे बडा खिलाडी असे अनेक गाजलेले सिनेमे केले आहेत्. २००२ साली तिने शेवटचा बॉलीवूड सिनेमा केला होता.
२०१६ साली ठाणे पोलिसांनी दाखल केलेल्या २००० कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणात ममताचे नाव समोर आले होते. आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट आणि तस्करी करण्याच्या उद्देशाने एका गँगस्टरला मेथम्फेटामाइनच्या बेकायदेशीर उत्पादनासाठी इफेड्रिनचा पुरवठा करणाऱ्या’ आरोपींमध्ये तिचे नाव होते. ममता तिचा साथीदार विकी गोस्वामी आणि अन्य सहआरोपींसोबत जानेवारी २०१६ मध्ये केनियामध्ये आंतरराष्ट्रीय ड्रगसंबंधी एका बैठकीत सहभागी झाली होती, असा तिच्यावर आरोप होता.