पुणे : शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये आता डीएड किंवा बीएड पूर्ण केलेल्या तरुण-तरुणींना कंत्राटी शिक्षक म्हणून नेमले जाणार आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमले जाणार असून त्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडेच उमेदवाराला अर्ज करावा लागणार आहे
दहापेक्षा कमी पटाच्या शाळांमधील कार्यरत शिक्षकांची नेमणूक आता जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या शाळांमध्ये (ज्या शाळांमध्ये पटसंख्या अधिक आहे, पण शिक्षक कमी असलेल्या ठिकाणी) केली जाणार आहे. समग्र शिक्षा अभियानातून या कंत्राटी शिक्षकांचे मानधन दिले जाणार आहे. कंत्राटी शिक्षक नेमण्याचा अधिकार प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना असून ते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांना नेमणुका देतील.
दरमहा १५ हजार रुपयांचे मिळणार मानधन
दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आता डीएड-बीएड शिक्षण झालेल्या तरुण- तरुणींना नियुक्ती दिली जाणार आहे. त्यांना नियुक्त्तीवेळी हमीपत्र द्यावे लागणार असून नियुक्तीनंतर पुन्हा त्या जागेवर कायम करण्याची मागणी ते करू शकणार नाहीत. सुरवातीला त्यांची नियुक्ती एका वर्षासाठी असणार आहे. ज्यांचे काम समाधानकारक वाटेल, त्यांना पुढे त्याठिकाणी मुदतवाढ दिली जाणार आहे. राज्यभरात डिसेंबरनंतर कंत्राटी शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे.