मुरबाड : मुरबाडमध्ये माजी उपसरपंचाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुरबाडच्या नारिवली गावामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पीडित मुलीने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी माजी सरपंचाविरोधात मुरबाड पोलिस ठाण्यामध्ये पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मुरबाडमध्ये माजी उपसरपंचाने ओळखीमध्ये असलेल्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलगी दहावीमध्ये शिकत आहे. अभ्यासाचे मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने पीडित मुलाला घरी बोलावून आधी तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिला गावातल्या एका पडीक घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
या प्रकारानंतर पीडित मुलीने कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला, मुलीच्या कुटुंबीयांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने दयानंद भोईर याने आपल्यावर बलात्कार केल्याची माहिती दिली. मुलीवर बलात्कार झाल्याचे ऐकून पीडितेच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून मुरबाड पोलिस ठाण्यात दयानंद भोईरच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.