इंदोर: देशातील बळीराजासाठी मध्यप्रदेशच्या इंदोरमधील आयआयटीने अनोखे तंत्रज्ञान विकसित केले आहे. एलईडी लाईटवर आधारित विशेष साठवणुकीच्या या तंत्रज्ञानाद्वारे फळ-भाज्यांना ३० ते ४० दिवसांपर्यंत खराब होण्यापासून सुरक्षित ठेवले जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेपर्यंत अतिशय माफक खर्चात फळ-भाज्यांची सुरक्षित साठवणूक करणे शक्य असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
आयआयटी इंदोरने जवळपास तीन वर्षांच्या अथक संशोधनानंतर हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यात ‘फोटोडायनेमिक इनेक्टिवेशन’ (पीडीआय) पद्धतीचा वापर संशोधकांनी केला आहे. एलईडी लाईटवर आधारित हे तंत्रज्ञान फळ-भाज्यांना पूर्णपणे ताजे आणि रोगमुक्त ठेवते. शिवाय त्यावर कुठल्याही प्रकारच्या सूक्ष्म जीवांची वाढ होणार नाही, याची काळजी घेतली जाते. हे तंत्रज्ञान विशेष करून लहान शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल, अशी आशा आयआयटीचे प्राध्यापक देबायन सरकार यांनी बुधवारी याविषयी माहिती देताना व्यक्त केली.
योग्य भाव मिळेपर्यंत आपल्या घरातच फळ-भाज्यांना सुरक्षित ठेवण्याची धडपड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही फायदेशीर गोष्ट आहे. १० बाय १० फुटांच्या खोलीत प्रतिमहिना अवघ्या १ हजार रुपयांच्या खर्चातून हे तंत्रज्ञान बसवले जाऊ शकते. या माध्यमातून शीत साठवणुकीशिवाय फळ-भाज्यांना ३० ते ४० दिवसांपर्यंत सुरक्षित ठेवले जाऊ शकते, असा दावा अधिकाऱ्यांनी केला. या तंत्रज्ञानाद्वारे फळ-भाज्यांवर विशेष तरंग असणाऱ्या निळ्या व हिरव्या एलईडी लाईटचा मारा केला जातो.
लाईटच्या प्रकाशासोबत फळ-भाज्यांवर बी-२ जीवनसत्त्वाचीही फवारणी केली जाते. त्यामुळे फळ-भाज्या या जास्त काळ तग धरून राहतात. तसेच त्यावर कुठल्याही सूक्ष्म जीवांचा प्रादुर्भाव होत नाही, असे सरकार यांनी म्हटले. विशेष बाब म्हणजे या तंत्रज्ञानाला एका मोबाईल अॅपशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दूर असतानादेखील साठवणूक कक्षातील फळ-भाज्यांवर लक्ष ठेवता येईल. या तंत्रज्ञानाच्या मदतीने खुल्या खाद्यपदार्थांसह डबाबंद अन्नपदार्थ देखील जास्त काळापर्यंत सुरक्षित ठेवता येतील, असे संशोधकांचे म्हणणे आहे.