पुणे : शहरातील वेताळ टेकडी,वारजे टेकडी, तळजाई टेकडी, तुकाई टेकडी, सूस खिंड येथील पाषाण टेकडी, कीर्ती गार्डन टेकडी, कोथरूडमधील म्हातोबा टेकडी येथे सतत लूटमार होत असते. या ठिकाणी जाण्यास जोडप्यांना बंदी घालावी, अशी मागणी मनसेचे उपशहरप्रमुख सुहास निम्हण यांनी केली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रात्री-अपरात्री तरुण-तरुणी एकटे-दुकटे भेटण्यासाठी जात असतात. हे तरुण-तरुणी प्रेमिक असल्यामुळे निर्जनस्थळी बसतात.
अशाच ठिकाणी अनेकदा दारुडे व तळीराम दारू पिण्यासाठी येत असतात. याचाच फायदा घेऊन चोर, लुटेरे, तळीराम अशा जोडप्यांना लुटतात. त्यामुळे देशाचे, समाजाचे, परिसराचे नाव खराब होत असते. पोलीस व पालिका प्रशासनाने टेकड्यांवर गस्त वाढवून तेथे येणाऱ्या तळीराम, तसेच जोडप्यांना टेकडीवर जाण्यास मज्जाव करून निर्जन स्थळी बसणाऱ्यांवर कारवाई करावी, म्हणजे आपोआप लूटमार, बलात्कार, विनयभंग यांसारखे गुन्हे कमी होतील, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.