पुणे : जिममध्ये व्यायाम करताना हार्ट अटॅक आल्याने तीस वर्षीय पैलवानाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने कुस्ती क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान विक्रम शिवाजीराव पारखी (वय-३०) असं मृत्यू झालेल्या पैलवानाचं नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी माण येथे असणाऱ्या जिममध्ये घडली आहे.
पैलवान विक्रम पारखी यांचा १२ डिसेंबर रोजी विवाह होणार होता. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळच असल्याने संसाराच्या आखाड्यात उतरण्यापूर्वीच ते आयुष्याच्या आखाड्यात चितपट झाले आहेत. त्यामुळे परिसरात आणि कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
पैलवान विक्रम पारखी हे मुळशी तालुक्यातील माण येथे राहण्यास होते. बुधवारी सकाळी ते माण येथे असणाऱ्या जिममध्ये व्यायामासाठी गेले होते. तेथे व्यायाम करत असताना त्यांना अचानक त्रास होऊ लागला. त्यांना तात्काळ पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कुमार महाराष्ट्र केसरी, ब्रॉंझ पदक, आदर्श व गुणी खेळाडू असे अनेक किताब पटकावलेल्या पैलवानाच्या अचानक जाण्याने सर्व मुळशी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. मुळशीतल्या माणगावचा भूमिपुत्र असलेल्या विक्रम पारखी यांनी कुमार महाराष्ट्र केसरी पदावर आपले नाव कोरले होते.
२८ नोव्हेंबर २०१४ रोजी वारजे येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित “महाराष्ट्र राज्य कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा २०१४” झाली होती. त्या स्पर्धेत विक्रमने अजिंक्यपद मिळवले होते. विक्रम याने अनेक राष्ट्रीय पदके व किताब मिळवले आहेत. महाराष्ट्र राज्यातील पैलवान, वस्ताद कुस्तीशौकीन हळहळ व्यक्त करत आहे. माजी सैनिक शिवाजीराव पारखी यांचे ते चिरंजीव तर युवा नेते बाबासाहेब पारखी यांचे बंधू होते.