पुणे : राज्यात पुढील चार दिवस पावसाचे आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात यलो अलर्ट असून, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, राज्यात थंडी गायब होऊ लागली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान मंगळवारी चंद्रपूर येथे १७ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
बंगालच्या उपसागरातील ‘फेंगल’ चक्रीवादळाचा परिणाम राज्याच्या वातावरणावर झाला आहे. राज्यात ढगाळ वातावरणाबरोबर काही ठिकाणी पावसाला अनुकूल हवामान झाले आहे. राज्यात थंडीचा कडाका वेगाने कमी झाला आहे. हवामान विभागाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा यलो अलर्ट आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली. या दरम्यान, या जिल्ह्यांमध्ये थंडीचे प्रमाण कमी राहणार आहे. त्यानंतर हवामान कोरडे राहणार असून, किमान तापमान कमी होण्याचा अंदाज आहे.