पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भुलथापा देऊन प्रेमात पाडल्यानंतर प्रियकराने मानसिक त्रास दिल्याने एका १७ वर्षाच्या मुलीने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना येरवड्यातील भाजी मार्केट येथील मुलीच्या घरी सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या प्रकरणी मुलीचे वडील रमेश पेठकर (वय-५२) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी केविन विल्सन चंदेवळ (रा. येरवडा) याला अटक केली आहे. आरोपीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीला अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती. येरवडा पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यावर मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमेश पेठकर यांचा भाजीपाला व्यवसाय आहे. पेठकर यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांची १७ वर्षांची अल्पवयीन मुलगी हिला आरोपी केविन चंदेवळ याने भुलथापा देऊन प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मोबाईलच्या माध्यमातून दोघे एकमेकांशी बोलत होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ती तणावात होती. त्यामुळे मोठ्या बहिणीने तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली असता केविनशी वाद झाल्याने तो तिच्याशी बोलत नसल्याचे समोर आले. त्यामुळेच ती तणावाखाली गेली होती.
दरम्यान, दोघांचे प्रेमसंबंध असताना केविन हा तिला मानसिक त्रास देऊ लागला. त्यामुळे तिचे मानसिक संतुलन बिघडले. यातूनच तिने सोमवारी रात्री घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, गुन्हे निरीक्षक स्वाती खेडकर, सहायक पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून केविन चंदेवळ याला अटक केली आहे. गुन्हे निरीक्षक स्वाती खेडकर तपास करीत आहेत.