योगेश मारणे / न्हावरे : घोडगंगा साखर कारखान्याचा आणि चासकमान डाव्या कालव्याच्या पाण्याचा प्रश्न येथून पुढेही प्राधान्याने सोडवला जाईल, त्यासाठी कायम कटिबध्द राहून सर्व सामान्यांच्या अडी-अडचणी सोडविल्या जातील, असा विश्वास माजी आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर माजी आमदार अशोक पवार यांनी मतदार, सर्वसामान्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे आभार मानण्यासाठी तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे आभार मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी पवार बोलत होते.
पुढे बोलताना म्हणाले की, मतदार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष गटाचे सर्वसामान्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव उपलब्ध राहणार आहे, असंही माजी आमदार अशोक पवार यांनी सांगितले. तसेच शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून शिरूर-हवेली तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी आणून विकास कामे केली जातील,असं आश्वासन देखील अशोक पवार यांनी यावेळी दिले.
महाराष्ट्रात फक्त शरद पवार यांचीच लाट होती. मात्र, मतदार यादीमधील विविध प्रकारच्या त्रुटी, दुबार नावे आणि विरोधकांचा ‘ईव्हीएम’ मशीन घोटाळा यामुळे विरोधक सत्तेवर आले आहेत, असेही अशोक पवार यांनी सांगितले.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रवक्ते विकास लवांडे, वाघोलीचे माजी सरपंच राजेंद्र सातव, शिवसेना (उबाठा) पक्षाचे संजय सातव, राष्ट्रवादीच्या लतिका जगताप, राजेंद्र पायगुडे,सुशांत कुटे यांची भाषणे झाली. यावेळी पुणे जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, राष्ट्रवादीचे हवेली तालुकाध्यक्ष संदीप गोते, शिरूर तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
हे आमदाराचे दुर्भाग्य…हा कसला आमदार?
माजी आमदार पवारांच्या आभार मेळाव्यादरम्यान बोलताना वाघोलीचे माजी सरपंच राजेंद्र सातव म्हणाले की, ज्या गावचा आमदार आहे. त्या गावामध्ये आमदाराचा कोणी साधा सत्कार समारंभाचा कार्यक्रमही घेतला नाही. तसेच विजयी मिरवणूकही काढली नाही. त्यामुळे हा कसला आमदार, अशी टिका राजेंद्र सातव यांनी आमदार माऊली कटके यांच्यावर केली.