कोल्हापूर: पूर्वी खून का बदला खून या न्यायाने मर्डर केले जात होते. काळ बदलला तशी व्याख्याही बदलत चालली आहे. ओठावर मिशीही फुटलेली नाही, पण खुनशी वृत्तीतून मारहाणीचा बदला खून याप्रमाणे १९ वर्षाच्या दोघा तरुणांसह एका अल्पवयीनाने एडक्याचे आठ वार करून यश किरण दाभाडे (वय १९. रा. अंबर, ता. हातकणंगले) याचा सोमवारी सायंकाळी खून केला. खुनानंतर सोशल मीडियावर तभी तो दुश्मन जलते है. हमारे नाम से हॅश … ३०२’ अशी पोस्ट केली. एलसीबीच्या पथकाने खून करून पळून गेलेल्या दोघांना मंगळवारी अटक केली.
चाकू, तलवार, कुऱ्हाडीने धाव घालून केले जाणारे खून आज हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटातून बिनधास्त दाखवले जात आहेत, अशी रक्तरंजित दृश्ये अंगावर काटा उभा करतात. काही वेळा किळसवाणी वाटणारी ही दृश्ये आज तरुणाईला बघायला बरी वाटतात, गुन्हेगारी वृत्तीचे तरुण खऱ्या आयुष्यातही याच घटनांचे अनुकरण करीत असल्याचे दिसून येते. आजपर्यंत झालेले भयानक पद्धतीचे खून तरुणांची मानसिकतेचे दर्शवते. चित्रपट, गुन्हेगारी पटकथा, हॉरर स्टोरी, सोशल मीडियातून दाखवल्या जाणाऱ्या या घटनांमुळे तरुण-तरुणीची मने दगडासारखी कठीण झाली आहेत. तसेच काहीजण अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याने असे भयानक कृत्य करताना त्यांना काहीच वाटत नाही. हातकणंगले तालुक्यातील अंबप या छोटया गावात यश दाभाडे व हर्षद दाभाडे या दोन तरुणांमध्ये वाद झाला होता. गतवर्षी यशने हर्षदाला मारहाण केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर यश अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठवले होते, तेथून तो लवकर बाहेर पडला.
आपणास मारहाण करणारा यश सुटला, याचा राग हर्षदला होता. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकावण्याचे प्रकार करीत होता, दुश्मनाचा काटा काढायचे, असे त्याने ठरवले होते. सोमवारी सायंकाळी यश दाभाडे आपल्या घरातील पाळीव कुत्रे फिरवण्यासाठी घरापासून थोड्या अंतरावर गेला होता. तेथेच गाठून हर्षद दाभाडे, त्याचा मित्र शफिक मुल्ला (वय १९, रा. आनंदनगर, कोडोली, पन्हाळा) व एक अल्पवयीन मुलगा अशा तिघांनी धारदार एडका हत्याराने डोक्यावर, खांद्यावर, पाठीवर, पोटावर वार करून खून केला.
खून केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले, पेठवडगाव व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, एपीआय चेतन मसुटगे, उपनिरीक्षक शेष मोरे, हिंदुराव केसरे, युवराज पाटील, समीर कांबळे, शिवानंद मठपती, संजय कुंभार, सागर माने, विजय इंगळे, संजय पडवळ, विनोद चौगुले कृष्णांत पिंगळे, विनोद कांबळे, यशवंत कुंभार, सुशील पाटील, हंबीरराव अतिग्रे यांनी तपास करून तिघांना अटक केली.
नडला तो तिरडीवर चढला
आज तरुणाचे गट एकमेकांना सोशल मीडियावरून खुन्नस देत आहेत. सहा महिन्यांपूर्वी संभाजीनगर परिसरात खुन्नसी स्टेटसच्या वादातून एका गुंडाचा खून झाला होता. तरुण रिल्स करून एकमेकांना चिथावणी देत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी अशा अनेक रील्स हीरोना अटक करून कारवाई केली होती. ‘नडला तो तिरडीवर चढला, भाईचा नाद करायचा नाही, हात लगाने से पहिले जिगरा देखना अशा प्रकारची खुन्नसी रील्स काहींनी पोस्ट केल्या होत्या.
मृतदेहावरही वार….
एखाद्याचा मुडदा पाडल्यानंतर खून करणाऱ्यांचे मन शांत होत नाही. तो मृतदेहावरही वार करत राहतो, यावरून त्याच्या मनात मृताबद्दल किती राग होता, हे दिसून येते. रंकाळा टॉवर परिसरात गतवर्षी एका सराईत गुन्हेगाराचा खून करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात त्या तरुणाचे मुंडके तुटेपर्यंत हल्लेखोर वार करीत होते. यावरून विरोधी व्यक्तीवर किती राग असतो हे दिसून येते.