रायगड : दोन दिवसांपूर्वी रायगडच्या श्रीवर्धन येथे निवृत्त बँक कर्मचारी रामदास खैरे यांचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांकडून या मृत्यूच्या कारणांचा शोध घेत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात एका महिलेने खैरे याना प्रेमाच्या जाळ्यात ओढून पैशांसाठी पतीच्या मदतीने हत्या केल्याची माहिती उघडकीस आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रायगडच्या श्रीवर्धन येथे वास्तव्यास असलेले रामदास खैरे यांचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत पोलिसांकडून तपास सुरु केल्यानंतर प्रेम प्रकरणातून हा प्रकार झाल्याची माहिती उघड झाली होती. यानंतर पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी केली असता अनैतिक संबधातुन रामदास खैरे यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रामदास खैरे यांच्याशी एका महिलेने प्रेम संबधांचा बनाव रचला होता. संशयित आरोपी महिलेने रामदास खैरे यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखविले. इतकेच नाही तर त्यांच्याकडून दागिने आणि रोख रक्कम सुद्धा घेतली होती. दरम्यान खैरे यांनी सदर महिलेजवळ दिलेले दागिने आणि पैसे परत मागितले. मात्र महिलेकडून देण्यास टाळाटाळ हो लागली होती. यामुळे सदर महिलेने खैरे याना संपविण्याचा कट रचला होता.
जेवणात दिले कीटकनाशक..
दागिने आणि पैसे परत करण्याचा तगादा लावला असता सदर महिलेने आपल्या पतीला सोबत घेवून खैरे यांना जेवणातून कीटकनाशक दिले. त्यानंतर खैरे बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना ठार मारून हे दोघेही फरार झाले. मात्र महिलेला तीच्या पतीसह रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून अटक करण्यात आली आहे.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.