नवी दिल्ली: बॉर्डर-गावसकर करंडक मालिकेतील सलामीच्या लढतीत भारतीय संघाला विजयी आघाडी मिळवून देणारा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहमध्ये कुशल कर्णधाराचे गुण ठासून भरले आहेत. नियमित कर्णधार रोहित शर्माने नेतृत्व सोडल्यानंतर दीर्घकालीन पर्याय म्हणून बुमराहकडे पाहावे, असे भारताचा कसोटीतील तारांकित फलंदाज चेतेश्वर पुजाराला वाटते.
रोहितच्या अनुपस्थितीत प्रभारी कर्णधार बुमराहने भारताला पर्थ कसोटीत शानदार विजय मिळवून दिला होता. संघाचे नेतृत्व करताना त्याने अचूक टप्प्यावर मारा करत गोलंदाजीची आघाडीही यशस्वीपणे सांभाळली होती. बुमराह दीर्घकालीन कर्णधारपदासाठी एक व्यावहारिक पर्याय आहे, यामध्ये शंका नाही, घरच्या भूमीवर मालिकेत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये पहिला कसोटी सामना खेळत होता, तेव्हा त्याने कठीण परिस्थितीत आपल्या नेतृत्व कौशल्याचे एक उत्तम उदाहरण सादर केले. पर्थ कसोटीचा संदर्भ घेत पुजारा म्हणाला, मला विश्वास आहे की त्याच्याकडे संघाचे नेतृत्व करण्याची प्रतिभा आहे. त्याच्याकडे नक्कीच क्षमता आहे आणि तो संघातील महत्त्वाचा माणूस आहे. तुम्ही त्याच्याकडे बघा, तो कधीच फक्त स्वतःबद्दल बोलत नाही, तो संघ आणि इतर खेळाडूंबद्दल बोलतो.
तारांकित गोलंदाज बुमराहबद्दल तो पुढे म्हणाला, ड्रेसिंग रूममधील खेळाडूंशी त्याचे जिव्हाळ्याचे नाते असून सहकार्य करण्यास तो नेहमीच उत्सुक असतो. अनुभवी खेळाडू असेल तर तो शांत राहील, चांगल्या कर्णधाराचे हे एक लक्षण आहे.
सिराजकडून प्रशंसा
पर्थ कसोटीत ५ बळी घेणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या पुनरागमनाचे श्रेय जसप्रित बुमराहला दिले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सिराजचा बळीसाठी संघर्ष सुरू होता. मात्र, पार्थ कसोटीतून त्याने लय मिळवली आहे ऑस्ट्रेलिया पंतप्रधान एकादश संघावर विजय मिळवल्यानंतर सिराज म्हणतो, नेहमीच जस्सी भाईशी (बुमराह) चर्चा करतो. पर्थ कसोटी अगोदरही आपल्या गोलंदाजीबद्दल त्याव्याशी संवाद साधला होता.
बळी मिळो वा न मिळो, तो नेहमीच पाठीशी उभा होता. संघर्ष सुरू असताना एकाच टप्प्यावर मारा कर आणि खेळाचा आनंद घे, असा सल्ला बुमराहने आपल्यास दिल्याचे सिराजने सांगितले. सिराजने कठीण काळात आपल्यास मार्गदर्शन करणारे माजी गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण यांचेही आभार मानले. भरत सरांना बऱ्याच काळापासून ओळखतो. त्यानीही गोलंदाजीचा आनंद घे आणि बळी मिळवण्यासाठी उतावळा होऊ नको, असा सल्ला दिला होता.