मुखेड : मेहुणीसोबत शेतीचा वाद न्यायालयात सुरू असताना मेहुणीस मदत का करतोस ? असे म्हणून धमकी दिल्यामुळे एकाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. ही घटना बेळी पाटी (ता. मुखेड, जि. नांदेड.) येथील दत्त मंदिराच्या बाजूला रविवारी (दि. एक) रात्री नऊच्या दरम्यान घडली. या प्रकरणी एकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश पर्वतराव जाधव (रा. मंडगी, ता. देगलूर, जि. नांदेड. हल्ली मुक्काम माळवाडी, हडपसर, पुणे) याने मुखेड येथील बेळी जवळील दत्त मंदिराजवळ विष प्राशन करून आत्महत्या केली. मृताच्या बॅगमध्ये सुसाईड नोट सापडली आहे. सुसाईड नोटमध्ये नमूद केल्यानुसार मेहुणीचा शेतीचा वाद कोर्टात सुरु असून मयत सुरेश जाधव हा कोर्टाच्या कामात मेहुणीला मदत करीत असल्याच्या कारणावरून आरोपी शाम लुटे याने मयतास ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे सुरेश जाधव याने विष पिऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी गजानन जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शाम लुटे (रा. होकर्णा, ता. मुखेड) याच्याविरुद्ध मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.