कळवण (नाशिक): शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या शेतातील विहिरीत पडल्याची घटना कळवण तालुक्यातील गोलाखाल येथे घडली. याबाबत माहिती मिळताच वनविभागाने शर्थीचे प्रयत्न करीत बिबट्याला जेरबंद करून विहिरीबाहेर काढले आहे. येथील शेतकरी रामचंद्र महाले यांच्या विहिरीत रात्रीच्या सुमारास हा बिबट्या पडला होता.
दरम्यान, विहिरीतून आवाज येत असल्याने महाले यांनी विहिरीत पाहिले असता त्यांना बिबट्या आढळून आला. त्यांनी तातडीने याबाबत वनविभागाला माहिती दिली. वनविभाग पिंजऱ्यासह पथकाला घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सोमवारी (दि.२) दिवसभर प्रयत्न करून या बिबट्याला बाहेर काढले आहे.
कनाशी वन परीक्षेत्र अधिकारी उमेश वाघ व लेखापाल हरिश्चंद्र आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल दिगंबर भोये, सुदाम भोये, शशिकांत ढाकणे, नामदेव खांडवी, वनरक्षक दत्तू बहिरम, विजय गायकवाड, बानू भोये, लता ठाकरे यांनी घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा विहिरीत सोडला व बिबट्याला जेरबंद केले. बिबट्याला कनाशी वनविभागाच्या मौजे खडकवण येथील रोपवाटिकेत औषधोपचार व अन्न देण्यासाठी ठेवण्यात आले आहे. वरिष्ठांच्या आदेशाने रात्री बिबट्याला पुन्हा नैसर्गिक आधिवासात सोडण्यात येणार आहे.