पुणे : वाघोली भागातून हरवलेल्या तीन वर्षांचे बालक हरवले होते.पोलिसांनी या हरवलेल्या बालकाचा शोध अवघ्या चार तासात लावला आहे. एका महिलेने हरवलेला मुलगा सापडल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याच्या पालकांचा शोध घेऊन मुलाला त्यांच्या ताब्यात दिले आहे.
वाघोलीतील बायफ रस्त्यावरील निखार लेडीज शाॅपजवळ मनीषा चेतन सोनार यांना एक तीन वर्षांचा मुलगा दिसून आला. सोनार यांनी त्याच्याबरोबर कोण आहे का?, याचा शोध घेतला मात्र, त्याच्या पालकांचा शोध न लागल्याने त्यांनी त्वरीत या घटनेची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पोलीस कर्मचारी प्रतिक्षा पानसरे, सचिन पवार यांना दिली. त्यांनी याबाबततची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांना दिली. सद्या शहरातून बेपत्ता झालेल्या महिला आणि मुलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान माेहीम राबविण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाघोली भागात तीन वर्षांचा मुलगा सापडल्याची माहिती छायाचित्रासह पोलिसांनी त्वरीत समाज माध्यमांमध्ये प्रसारित केली. पोलिसांनी डोमखेल रस्ता, बायफ रस्ता, दत्तविहार परिसरातील सोसायटी, तसेच मजुरांच्या वसाहतीत शोधमोहीम राबविली. त्यानंतर अक्षय संस्कृती सोसायटीतून एक तीन वर्षांचे बालक बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक तेथे पाेहाेचले.
पोलिसांनी बालकाचे छायाचित्र सोसायटीतील रहिवाशांना दाखवायला सुरवात केली. मुलाच्या आईने छायाचित्र पाहिले. मुलगा सुखरुप सापडल्याने तिला अश्रृ अनावर झाले. पोलिसांनी मुलाचा शोध घेऊन त्याला सुखरुप ताब्यात दिल्याने मुलाच्या आईने पोलिसांचे मनाेमन आभार मानले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, सुहास तांबेकर, कानिफनाथ कारखेले, कीर्ती मांदळे यांनी ही कामगिरी केली.