मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेनं भरभरून मत दिलं आहे. निवडणूक निकाल लागून एक आठवडा उलटून गेल्यानंतरही महायुतीचे सरकार अजून स्थापन होत नाहीये. पण अखेर आता गुरुवारी 5 डिसेंबर रोजी शपथविधीचा मुहूर्त ठरला असून, मुंबईतील आझाद मैदान येथे 5 डिसेंबर रोजी भव्य-दिव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीची जोरदार तयारी आझाद मैदानावर सुरू आहे. या साठी भव्य मंडप उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजप नेत्यांनी सोमवारी आझाद मैदानावर या तयारीचा आढावा घेतला.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आणि विधान परिषदेतील भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आझाद मैदानावरील शपथविधी सोहळ्याच्या तयारीची सोमवारी पाहणी केली. या शपथविधी सोहळ्यासाठी साधारणतः 30 ते 40 हजार लोक अपेक्षित आहेत. त्या अनुषंगाने आझाद मैदानात एकुण 3 स्टेज असणार आहे. दरम्यान या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातील दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर केंद्रीय मंत्री देखील या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. तब्बल 22 राज्याचे मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईत येणार आहेत. विशेष म्हणजे लाडक्या बहिणींना या सोहळ्यासाठी रेड कार्पेट टाकण्यात आलं आहे. लाडक्या बहिणींना या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे. नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी तब्बल 40 हजार लोकांची उपस्थिती असणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरमधील ‘या’ चाहत्याला विशेष निमंत्रण
नागपुरातील एक ‘चहावाला’ महायुती आणि भाजपच्या शपथविधीला जाणार आहेत. नागपुरात चहाचा स्टॉल चालवणारे गोपाल बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांचे मोठे फॅन आहेत. शहरातील रामनगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून गोपाळ यांचा चहाचा स्टॉल आहे. दरम्यान, या चहाच्या स्टॉल वर देवेंद्र फडणवीस यांचा फोटो ही आहे. अशातच मुंबईच्या आझाद मैदानावर 5 डिसेंबर रोजी संपन्न होणाऱ्या या शपथविधीसाठी गोपाळ यांना निमंत्रण आल्याने ते देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे.