पुणे : पेट्रोल चोरीच्या संशयातून एका तरुणाला गंभीर मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील न-हे येथे (दि. 25 नोव्हेंबर) घडली आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांकडून नऱ्हे भागातील माजी उपसरपंचासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समर्थ नेताजी भगत (वय 20 रा. व्यंकटेश्वरा सोसायटी, अभिनव कॉलेज रोड, नऱ्हे) असे उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचे वडील नेताजी सोपान भगत यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नऱ्हे भागातील मानाजीनगर भागात (दि. 25 नोव्हेंबर) रोजी सकाळी सहाच्या सुमारास माजी उपसरपंच सुशांत कुटे यांच्या कार्यालयासमोर समर्थ भगत याच्या दुचाकीतील पेट्रोल संपले होते. यावेळी तो दुसऱ्या दुचाकीतून पेट्रोल काढत होता. यावेळी गौरव संजय कुटे व त्याच्या मित्रांनी समर्थला पेट्रोल काढताना पाहिले. तो पेट्रोल चोरत असल्याचे समजून त्यांनी समर्थला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत समर्थ हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी समर्थचे वडील सोमवारी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेले असता पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली, असा आरोप वडील नेताजी भगत यांनी केला आहे. याप्रकरणी गौरव संजय कुटे (वय 24) अजिंक्य चंद्रकांत गांडले (वय 20) राहुल सोमनाथ लोहार (वय 23, सर्व रा. मानाजीनगर, नऱ्हे) यांना पोलिसांनी अटक केली.
दरम्यान, आरोपींनी समर्थला मारहाण करताना तयार केलेले व्हिडिओ पोलीसांना मिळाले असून पोलीसांनी आरोपींचे मोबाईल जप्त केले आहेत. तसेच माजी उपसरपंच सुशांत सुरेश कुटे हा पसार झाला असून, त्याचा शोध सुरु आहे.