-बापू मुळीक
सासवड : पुरंदर तालुक्यातील पूर्व भागात गेल्या दोन महिन्यापासून महावितरणाच्या गैरकारभाराचा सावळा गोंधळ दिसून येत आहे. दिवस पाळीला वीजपुरवठा आठवड्यातून तीन दिवस असते, परंतु ते वीज पुरवठा एक दिवसाआड केल्याने शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी देणे अवघड झाले आहे. शेतकऱ्यांना एक दिवसाआड पाळीमुळे अडचण झाली आहे, लाईटमुळे पाळीवाले यांना शेतातील पिकांना पाणी देता येत नाही अशा तक्रारी आहेत. या शेतकऱ्यांनी नेमकं कशा पद्धतीने शेताला पिकासाठी पाणी द्यायचे हा एक शेतकऱ्यापुढे प्रश्नच उभा राहिला आहे.
हवामान बदलामुळे बऱ्याच ठिकाणी विहिरींचे व कुपनलिकेचे पाणी हे कमी प्रमाणात झाले आहे. महावितरणाने दिवस पाळीत वीज पुरवठ्याचे योग्य नियोजन न केल्याने शेतकऱ्याची कोंडी झाली आहे. ज्याची पाळी एक दिवसाची असेल, त्यावेळी समजा सहा जण असतील तर त्या शेतकऱ्याला सातव्या दिवशी पाळी मिळेल व ज्या दिवशी त्या शेतकऱ्याची पाळी येईल त्या दिवशी जर वीजच नसेल तर त्या शेतकऱ्याला पंधरा दिवस पाण्याशिवाय आपली शेती कशी जपावी हेच समजत नाही.
पूर्व भागातील भरपूर शेतकऱ्यांनी तक्रारी आत्ताच्या आमदारांना केल्या. पूर्व भागातील शेतकऱ्यांना जर त्रास होत असेल, पिके जळत असतील तर यावर आमदार नक्की आंदोलन करणार की, मीटिंग लावणार हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. पूर्व भागातील शेतकऱ्यांचा गंभीर प्रश्न पिकासाठी आहे, हा प्रश्न आमदार नक्की सोडवणार का? यासाठी महावितरणच्या या भोंगळ कारभाराला नेमका कोणाचा धाक असणार आहे? हा प्रश्न पुरंदर मधील सर्वसामान्य नागरीकांना पडलेला आहे.
धोरण, नियम, वगैरे काही नाही, लोड बसत नाही. म्हणून ॲडजस्टमेंट केलेले आहे.
-जीवन ठोंबरे, शाखा अभियंता- राजेवाडी