पुणे : उसतोडीसाठी मजूर घेऊन निघालेला ट्रॅक्टर मुकादमाने काळजीपूर्वक चालवला नसल्याने ऊसतोड कामगारांच्या तीन मुलांचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (दि.02) सकाळी सहा वाजण्याच्या सुमरास शिंगेवाडी (ता. माढा) येथे घडली आहे.
रिंकू वसावी (वय-3), आरव पाडवी (वय-4), नीतेश वसावी (वय-3) सर्वजण राहणार शिगेवाडी ता. माढा अशी मृत मुलांची नावे आहेत. या घटनेसंदर्भात सुखलाल करमा वसावी यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुखलाल वसावी हे शिंगेवाडी येथे ऊसतोड कामगार म्हणून वास्तव्यास आहेत. ते दुस-यांच्या शेतामध्ये ऊसतोडणी करण्यासाठी (एम. एच.45 ए.एल.4753) या ट्रॅक्टरला गाडी जोडून मुकादम खिमजी हा फिर्यादी वसावी त्यांची पत्नी सायकू वसावी, मुलगी रिंकू, ऊसतोड जोडीदाराची पत्नी निमा शिवा वसावी, मुलगा नीतेश शिवा वसावी, परमिला वसंत पाडवी आणि तिचा मुलगा आरव पाडवी यांना घेऊन सकाळी शेताकडे निघाला होता. पुढे विहीर असल्याचे माहित असुनही त्याने हयगयीने ट्रॅक्टर चालवली आणि काही अंतरावर जाताच ट्रॅक्टर विहिरीत पडला. यावेळी ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या काही पुरुषांना पोहता येत असल्यामुळे ते पाण्याबाहेर आले. तसेच काही महिलांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. ही घटना समजताच ग्रामस्थांनी मोटार लावून विहिरीतील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तसेच क्रेनच्या साहाय्याने ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आला. परंतु ट्रॅक्टरच्या हेडवर बसलेल्या उसतोड कामगारांची तीनही मुले विहिरीत बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेदरम्यान, ट्रॅक्टरवील चालक मुकादम खिमजी जालम्या तडवी याने विहिरीतून बाहेर पडून पसार झाला. फिर्यादीने दिलेल्या माहितीवरुन मुकादम खिमजी जालम्या तडवी याच्याविरुद्ध कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.