नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा रविवारी (दि. १) दोन सत्रांत आयोजित करण्यात आली होती. शहरातील ४४ केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी १६,९६२ परीक्षार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यात दोन्ही सत्रांत केवळ १० हजार ७२८ विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिली. दरम्यान, शहरातील व्ही. एन. नाईक महाविद्यालयातील एका केंद्रात परीक्षा सुरू असताना एका परीक्षार्थीला प्रसूती कळा आल्यामुळे तिला तातडीने खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
शहरातील ४४ केंद्रावर सकाळी १० ते १२ आणि दुपारी ३ ते ५ अशी दोन सत्रांत ही परीक्षा घेण्यात आली. यासाठी दीड हजारांवर अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मागील काही महिन्यांपासून या परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आले होते. यात कृषी पदवीधर असणाऱ्या तरुणांच्याही जागांचा समावेश करावा, यासाठी स्पर्धा परीक्षार्थीनी वारंवार आंदोलनही केली होती. त्यानुसार ठरल्याप्रमाणे रविवारी ही परीक्षा घेण्यात आली. उमेदवारांची तपासणी करून हॉलतिकीट पाहून त्यांना आत प्रवेश देण्यात येत होता.
परीक्षेचे हॉलतिकीट हे उमेदवारांना नव्याने उपलब्ध करून देण्यात आले होते. शहरातील व्ही. एन. नाईक महाविद्यालयातील एका केंद्रात ही परीक्षा सुरू असताना मालेगाव येथील एका विद्यार्थिनीला प्रसूतीकळा आल्या. त्यानंतर परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक डॉ. सचिन शिंदे, वरिष्ठ लिपिक सोमनाथ धात्रक आणि सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी एका खासगी दवाखान्यात दाखल केले. तेथे प्रसूती होऊन कन्यारत्न प्राप्त असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या परीक्षेला ६२३४ विद्यार्थ्यांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे.