मुंबई : राज्यात वेगाने धावणारी शिवशाही बस बंद होणार अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. दरम्यान, सातत्याने पसरत असलेल्या अफवांवर अखेर एसटी महामंडळाने पडदा टाकला आहे. एसटी महामंडळाकडे सध्या 792 शिवशाही बसेस सुरु आहेत. त्यामध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही. तसेच सदर बसेस या बंद करण्याचा एसटी महामंडळाचा कोणताही विचार नाही, अशी स्पष्ट भूमिका एसटी महामंडळाने मांडली आहे.
सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात एकूण 792 शिवशाही बस आहेत. त्यापैकी 500 बस धावत आहेत. तर उर्वरित 392 बस कार्यशाळेत विविध कारणांसाठी दाखल झाल्या आहेत. शिवशाही बस या वातानुकूलित असतात. मात्र, आता त्याचे लालपरीत रुपांतर करण्यासाठी वातानुकूलित यंत्रणा काढण्यात येणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु होती. तसेच शिवशाहीचे रूपांतर साध्या बसमध्ये केले जाणार असल्याचेही बोलले जात होते. मात्र, शिवशाही बसेसची सेवा अविरतपणे सुरु राहणार असल्याचे स्पष्टीकरण एसटी महामंडळाकडून देण्यात आले आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असंही सांगण्यात आलेलं आहे.
मुंबई-राजगिरी मार्गावर धावली पहिली शिवशाही बस
शिवशाही ही बस प्रथम 10 जून 2017 रोजी मुंबई-राजगिरी मार्गावर धावली आहे. तत्कालीन परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून शिवशाही बस सुरू करण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरात शिवशाही बसेस धाऊ लागल्या आहेत. त्यात महिलांना निम्म्या तिकीटाची सुविधा मिळू लागल्याने शिवशाही बसमध्ये मोठी गर्दी होताना दिसत आहे. निम्म्या दरात वातानुकूलित बसची सुविधा मिळत असल्याने महिला वर्ग शिवशाही बसचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत.