लोणावळा : लोणावळ्यामध्ये बस स्टॅन्डमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान राडा झाला आहे. यामध्ये दोन्ही गटामध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाली आहे. ही घटना आज (दि. ०२) दुपारी साडेबारा वाजण्याचा सुमारास घडली आहे. हे प्रकरण थेट लोणावळा पोलीस ठाण्यापर्यंत गेले आहे. याप्रकरणी लोणावळा पोलिसांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना बोलवून समज दिली असल्याची माहिती लोणावळा पोलिसांनी दिली आहे.
लोणावळ्यातील बस स्टॅन्डमध्ये चित्रपटाला साजेशी अशी फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास महाविद्यालयीन दोन गट आमने- सामने आले तेव्हा त्यांच्यात तुफान राडा झाला. १५ ते २० जणांच्या गटाने एकमेकांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
हाणामारी सोडवण्यासाठी बस स्टॅन्डमधील कर्मचारीमध्ये पडला. त्यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, तरी देखील काही तरुण एकमेकांना मारहाण करतच होते. याप्रकरणी लोणावळा पोलिसांनी महाविद्यालयीन तरुणांना समज दिली असून हे तरुण इयत्ता अकरावी आणि बारावीतील असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.