पिंपरी : मित्रासोबत चेस्टा मस्करी करत असताना मित्राची चेस्टा का केली,असं म्हणून डोक्यात कोयत्याने वार करुन तरुणाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ओंकार नवनाथ आरवडे (वय-२४, रा. जय योगेश्वर सोसायटी, कृष्णानगर, चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरुन पोलिसांनी सचिन दादासाहेब साळुंखे (वय-१९, रा. साईनाथनगर, निगडी) याला अटक केली आहे. तसेच त्यांच्या दोन साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार निगडीतील आण्णाभाऊ साठे क्रीडा मैदानात शनिवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार हे त्याचे मित्र यश पोतदार याच्यासोबत आण्णाभाऊ साठे क्रीडा मैदानात चेस्टा मस्करी करत थांबले होते. यावेळी सचिन साळुंखे व त्याचे दोन साथीदार त्या ठिकाणी आले. त्यांनी माझ्या मित्राची चेस्टा मस्करी का करतो असं विचारुन ओंकार याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.
तू येथून निघून जा, नाही तर तुला जीवे मारीन, अशी धमकी दिली. सचिन साळुंखे याने त्याच्याकडील कोयत्याने ओंकारला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक यलमार करीत आहेत.