पुणे : घरातून ऑनलाईन पद्धतीने काम देण्याच्या अमिषाने सायबर चोरट्यांनी वाघोलीतील एका तरुणाला ऑनलाईन टास्कच्या आमिषाने २७ लाख ४६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तरुणाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. सायबर भामट्यानी गेल्या महिन्यात (दि. ४ नोव्हेंबर) या तरुणाशी मोबाइलवर संपर्क साधला. घरातून ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगले पैसे मिळतील, असे आमिष त्यांनी या तरुणाला दाखविले. सुरुवातीला चोरट्यांनी त्याला ऑनलाईन काम दिले. या कामापोटी त्याला परतावाही देण्यात आला. परतावा दिल्यानंतर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर पुन्हा संपर्क साधला.
ऑनलाईन टास्कमध्ये पैसे गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्यांनी दाखविले. त्यानंतर तरुणाने चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी २७ लाख ४६ हजार रुपये गुंतविले. मात्र, पैसे गुंतविल्यानंतर त्याला परतावा देण्यात आला नाही. त्यानंतर तरुणाने चोरट्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाईल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.