लखनऊ: भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने सरते वर्ष संपुष्टात येण्यास ३० दिवस शिल्लक असताना आपला विजेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणला. घरच्या मैदानातील सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम फेरीवर अग्रमानांकित सिंधूने विजयी ठसा उमटवला. याशिवाय पुरुष एकेरीत लक्ष्य सेन, तर महिला मिश्र दुहेरीत त्रिसा जॉली व गायत्री गोपीचंदन यांनी बाजी मारली.
चीनच्या वू लुओ यूवर सिंधूने दोन गेमच्या लढतीत २१-१४, २१-१६ असा विजय संपादन केला. सिंधूचे जुलै २०२२ नंतरचे हे पहिलेच विजेतेपद ठरले आहे. जागतिक क्रमवारीत १८ व्या स्थानावर घसरलेल्या सिंधूने २०२४ मध्ये मलेशिया खुल्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. अग्रमानांकन प्राप्त लक्ष्य सेनने सिंगापूरच्या जियो हेंग जेसन तेहला २१-६, २१-७ असे सहज नमवले. महिला दुहेरीत जॉली व गोपीचंद या जोडीने चीनच्या बाओ ली जिंग व ली कियान या जोडीला ४० मिनिटांत २१-१८, २१-११ असे नमवले. मिश्र दुहेरीत तनीषा क्रैस्टो-धुव्र कपिला या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.