राहुलकुमार अवचट
यवत –पुणे सोलापुर महामार्गावरील भांडगाव (ता.दौंड) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हॉटेल झोपडी जवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता.४) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली आहे.
मनिषा संतोष सुर्यवंशी ( रा.भांडगाव, ता.दौंड , जि.पुणे ) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर कार चालक कुंडलिक सदाशिव आनंदकर ( वय ६५, रा. पिंपरी चिंचवड ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी निलेश दत्तात्रय सुर्यवंशी ( रा. वरवंड ) यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा सुर्यवंशी या टी.व्ही.एस कंपनीच्या ज्युपीटर दुचाकीवरून भांडगाव (ता.दौंड) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हॉटेल झोपडी जवळ रस्ता ओलांडत असताना, पुण्याकडून सोलापूरच्या दिशेकडे चाललेल्या कारने सुर्यवंशी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात सुर्यवंशी यांच्या डोक्याला व हातपायांना जबर मार लागून गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी तातडीने यवत ग्रामीण रुग्णालय नेण्यात आले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.