पुणे : वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या तोतया डॉक्टरला न्यायालायने दणका दिला. खडकी न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एल. व्ही. श्रीखंडे यांनी तोतया डॉक्टरला दोन वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
मीलनकुमार अमर ठाकूर (वय ३४, रा. धानोरी, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. ठाकूर वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांवर उपचार करत होता. याबाबतची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली. त्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा उमेश गलांडे यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी कारवाई करून ठाकूरला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.