नागपूर : समाजाची घटणारी लोकसंख्या हा चिंतेचा विषय आहे. लोकसंख्यावाढीचा दर हा २.१ पेक्षा कमी असायला नको, असे लोकसंख्याशास्त्र सांगते. त्यामुळे समाज टिकवायचा असेल, तर दोनपेक्षा जास्त म्हणजे किमान तीन अपत्ये असावीत, असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी १ डिसेंबरला नागपुरात बोलताना व्यक्त केले. कठाळे कुलसंमेलनात सरसंघचालक बोलत होते.
आजकाल तरुण पिढी एक अपत्यदेखील जन्माला घालत नाही, हा चिंतेचा विषय असल्याचे मत सरसंघचालकांपूर्वी बोलणाऱ्या वक्त्यांनी व्यक्त केले होते. आपले विचार मांडताना सरसंघचालक म्हणाले, लोकसंख्यावाढीचा दर २.१ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास तो समाज नष्ट होतो. त्या समाजाला कोणी नष्ट करत नाही, तर तो स्वतःहून नष्ट होतो. अनेक भाषा व समाज असेच नष्ट झाल्याचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी सांगितले.
आपल्या देशाची लोकसंख्या नीती वर्ष २०००च्या आसपास ठरली. यातही लोकसंख्यावाढीचा दर २.१ पेक्षा कमी असू नये, असे सांगण्यात आले आहे. दोनच्या पुढे म्हणजे किमान तीन असाच त्याचा अर्थ होतो. समाज टिकण्यासाठी ही संख्या महत्त्वाची आहे. समाज टिकला पाहिजे, हे सर्वांना वाटते. कारण तो आपला समाज आहे, असे सरसंघचालक म्हणाले. यावेळी त्यांनी व्यक्ती, समाज, संस्कृती यासंदर्भातही उपस्थितांना मार्गदर्शन केले.