-बापू मुळीक
सासवड : पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या 16 पैकी 13 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाजी झेंडे यांची अनामत रक्कम ही केवळ पाच मतांनी वाचली गेली. पुरंदर हवेलीत एकूण 2,84,734 इतके मतदान झाले. यापैकी नोटाला 1484 मते मिळाली. पोस्टल मतांमध्ये 106 मते बाद झाली. त्यामुळे 2 लाख 83 हजार 144 मते वैध ठरली. अनामत वाचवण्यासाठी वेधमतांच्या एक षष्टांस 1/6 म्हणजेच 47 हजार 191 मतांची आवश्यकता होती.
शिवसेनेचे विजयी उमेदवार विजय शिवतारे यांना 1 लाख 25 हजार 819 मते मिळाली. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसच्या संजय जगताप यांना 1 लाख 1 हजार 631 मते मिळाली, तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या राष्ट्रवादीच्या संभाजी झेंडे यांना 47 हजार 196 मते मिळाली. उर्वरित उमेदवारापैकी मनसेचे उमेश जगताप 2,920, सुरज भोसले 951, उत्तम कामठे 1,529, कीर्ती माने 1,366, सुरज घोरपडे 198, संजय निगडे 166, अतुल नांगरे137, अनिल गायकवाड 96, उदय कुमार जगताप 204, विशाल पवार 207, महादेव खेगरे 138, शेखर कदम 232, सुरेश वीर 354 अशी मते मिळालेली आहेत. तर माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांना 47,196, मते घेतली असून, त्यांची अनामत रक्कम अवघ्या पाच मतांनी वाचली आहे.
कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह पोस्टल मतदानात शिक्षक व शासकीय नोकर वर्गाने केलेली 106 मते बाद झाली आहेत. त्यामुळे संबंधित सुशिक्षित मतदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.