Eknath Shinde : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 10 दिवस उलटले असले तरी राज्यात अद्याप नवे सरकार स्थापन झालेले नाही. सरकार स्थापनेसाठी मोठ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत पेच सुरू असताना एकनाथ शिंदे हे साता-यातील दरे गावातून पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
आमचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय पीएम मोदी आणि अमित शहा घेतील. नरेंद्र मोदी आणि अमित शहा भाई जो निर्णय घेतील, ते आम्हाला मान्य आहे. माझा पूर्ण पाठिंबा असेल मी आधीच जाहीर केले होते. माझा निर्णय मी घेतला आहे.
तुम्ही मुख्यमंत्री व्हावं? अशी जनतेची मागणी असल्याची चर्चा आहेत?, या प्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “साहजिक आहे की, जनतेच्या मनात मी कॉमन मॅन म्हणून जे काम केलं. मी म्हणायचो की की, मुख्यमंत्री नाही तर कॉमन मॅन. मी कॉमन मॅन म्हणून काम केल्यामुळे साहजिक तशा भावना सर्वसामान्य माणसांच्या आहेत. तसेच मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वात निवडणुका झाल्या. दोन्ही उपमुख्यमंत्री बरोबर होते. तसेच सर्व सहकारी बरोबर होते. त्यामुळे मोठं यश मिळालं. मात्र, यामध्ये कोणताही संभ्रम नको. त्यामुळे मी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेतली आणि मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल हे स्पष्ट केलं”, असंही शिंदे म्हणाले.
राज्यात सत्ता स्थापनेचा पेच सुरू असताना एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ गावी गेल्याने राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपच्या पक्ष श्रेष्ठींनी घेतलेला निर्णय एकनाथ शिंदे यांना मान्य नसल्याचा आरोप विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी केला. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी गवावरून परतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.