पुणे : विधानसभेच्या निकालानंतर महायुती सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन नागपूरला 16 ते 21 डिसेंबर दरम्यान पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या अधिवेशनात प्रश्न उत्तरांचा कालावधी नसल्यानं हे अधिवेशन कमी दिवसांचे असणार आहे.
विशेष म्हणजे, या पहिल्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती अद्याप झालेली नसल्यामुळे त्यांची अनुपस्थिती जाणवणार आहे. याशिवाय अधिवेशनामध्ये लाडक्या बहीण योजनेच्या वाढीव रकमेवर महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्यामुळे अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
विधानसभा निवडणुकांनंतर राजकीय वर्तुळात सत्ता स्थापनेच्या घडामोडी सुरु आहेत. राज्याच्या नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असतानाच दुसरीकडे राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्याही तयारीची लगबग सुरु झाली आहे. मुंबईप्रमाणे आता नागपूरमध्येही संपूर्ण पेपरलेस अन् डिजीटल कामकाज सुरु होणार आहे.
विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला असून अद्यापही सत्तास्थापन झालेली नाही. महायुतीयील भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मुख्यमंत्रीपदासह महत्त्वाच्या खात्यांवरुन तिढा कायम आहे. सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाची जय्यत तयारी सुरु असून यंदाच्या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांसाठी डिजिटल आसनव्यवस्था असणार आहे. यासाठी युद्ध पातळीवर काम केले जात आहे.