योगेश पडवळ / पाबळ : आजी ग आजी… आणली ना ताजी ताजी भाजी, लई स्वस्त लावलीया घ्या बघा. हा आवाज आहे, विद्यालयातील छोट्या छोट्या विद्यार्थ्यांचा. तुम्ही आम्ही मोठमोठ्या गावांमध्ये आठवडी बाजार भरताना पाहिले आहेत. पण एखाद्या शाळेत मुलांनी भरवलेला भाज्यांचा व दैनंदिन वस्तूंचा पुरवठा करणारा बाजार पाहिला नसेल. असा आगळावेगळा प्रयोग शिरूर तालुक्यातील सविंदणे परिसरातील श्री गुरुदेव दत्त विद्यालय शाळेत केला आहे. विद्यार्थ्यांना गणितातील वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान व्हावे तसेच केवळ पुस्तकी म्हणजेच सैद्धांतिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञानही मिळावे, हाच त्यामागचा उद्देश आहे.
श्री गुरुदेव दत्त विद्यालय मधील 5 ते 8 वी लहान मुलांनी आपल्या घरच्या शेतीत पिकलेला भाजीपाला शाळेत आणून तो विकण्याचे धडे नुकतेच घेतले. शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सर्व विध्यार्थ्यांच्या पालकांनी आवर्जून शाळेत येऊन विद्यार्थ्यांकडून भाजीपाला खरेदी केला. मुलांना व्यवहार ज्ञान देण्यासाठी शाळेत आठवडे बाजार भरवण्यात आला होता. शाळेमधील पाचवी ते आठवी विद्यार्थ्यांनी या बाजाराचे नियंत्रण केले.
यात मुले आपापल्या शेतातून आणलेला भाजीपाला, कांदे, बटाटे, हिरवी मिरची, कोथिंबिर, मटकी, गवती चहा, वांगी, पालक, मेथी, गवार यासह खाद्यपदार्थांपैकी भेळ, वडा-पाव, चहा, बिस्कीट, इडली सांबार असे विविध पदार्थ घेऊन बसली होती. ते खरेदी करण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती. सरपंच मनीषा नरवडे यांनी या बाजाराला भेट देऊन मुलांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैद्धांतिक म्हणजेच व्यावहारिक ज्ञान मिळणेही आवश्यक आहे. त्यासाठी शाळेच्या व्यवस्थापनाने हा आठवडे बाजार भरवला जातो. ज्यातून खरोखरच खूप शिकायला मिळते. सोबतच गणित विषयाशी संबंधित अन्य व्यावहारिक ज्ञानही त्यांना मिळते.
शारदा मिसाळ, मुख्याधापिका