छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. २० ते २५ मिनिटांचे ऑपरेशन आहे, असे सांगून ऑपरेशन थिएटरमध्ये नेलेल्या साडेपाच वर्षीय चिमुकल्याचा डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे आणि निष्काळजीपणामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २६ एप्रिल ते ६ मे २०२४ या काळात गारखेडा भागातील वेदांत बाल रुग्णालयात घडली आहे.
डॉक्टरांनी चुकीचे उपचार केले. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने फाईलमधील उपचाराचे कागदपत्र गायब केले, असा अहवाल घाटीतील उच्चस्तरीय समितीने दिल्यानंतर बुधवारी सहा डॉक्टरांविरुद्ध पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दैविक अविनाश आघाव असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
डॉ. अर्जुन पवार, डॉ. शेख इलियास, डॉ. अजय काळे, डॉ. अभिजित देशमुख, डॉ. तुषार चव्हाण, डॉ. नितीन आधाने, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी डॉक्टरांची नावे आहेत. अविनाश दत्तात्रय आघाव (वय-४१. रा. सप्तश्री वाटिका, स्वप्ननगरी, गारखेडा परिसर) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी हे १७ वर्षांपासून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वकिली व्यवसाय करतात. त्यांचा मुलगा दैविकला गुप्तांगावर खाजेचा त्रास होऊ लागल्यामुळे २० एप्रिल रोजी वेदांत बाल रुग्णालयात नेले. तेथे डॉ. अर्जुन पवार यांनी फायमोसीस विथ पिनाइल टॉर्शन हा आजार असल्याचे सांगून त्यासाठी छोटेसे ऑपरेशन करावे लागेल, असे सांगितले.
२६ एप्रिल रोजी ऑपरेशन ठरले. २६ एप्रिलला सकाळी दैविकला ऑपरेशनसाठी नेण्यात आले. डॉ. अर्जुन पवार, भूलतज्ज्ञ डॉ. शेख मोहंमद इलियास यांनी २० ते २५ मिनिटांत ऑपरेशन होईल, असे सांगितले. मात्र ४५ मिनिटे झाली तरी ऑपरेशन झाले नव्हते. एक तासाने डॉ. पवार यांनी ऑपरेशन चांगले झाले आहे. बाळ सध्या बेशुद्ध असून ते थोड्यावेळाने शुद्धीवर येईल, असे सांगितले. त्यानंतर दैविक थोड्या वेळाने शुद्धीवर येईल, असे म्हणत १० दिवस डॉक्टरांनी नेमके काय झाले हे सांगणे टाळले. अखेर, ६ जून २०२४ रोजी डॉक्टरांनी दैविकला मृत घोषित केले.