पुणे : आठ महिन्यांपासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुणे महानगरपालिकेच्या विकासकामांना खीळ बसलेली असताना आता मिळकत कर वसुलीही कमी झाली आहे. महापालिकेची मिळकत कराची थकबाकी १० हजार कोटींच्यावर गेली आहे. त्यामुळे जी थकबाकी न्यायालयीन वादात नाही, ती वसूल करण्यासाठी आता प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यात आता थकबाकीदारांच्या घरासमोर बँड वाजविण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या २०२४.२५ च्या अंदाजपत्रकात मिळकत कर विभागास २ हजार ७२८ कोटींचे उद्दिष्ट आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत १ हजार ७७५ कोटींचाच कर जमा झाला आहे. त्यामुळे ३१ मार्च अखेरपर्यंत महापालिकेस जवळपास साडेनऊशे कोटींची वसुली करणे अपेक्षित असल्याने महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडून मिळकतींच्या जप्तीसह थकबाकीदाराच्या दारात बॅण्ड वाजविण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली जाणार आहे.
यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने दहा पथके तयार करण्यात आली आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून थकबाकीदारांच्या मिळकती सील करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी पालिकेच्या मिळकत कर विभागातील कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आता विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.