तुळजापूर : श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून येणाऱ्या लाखो भाविकांना येत्या काळात गर्दीमध्ये सुलभ दर्शन घेता यावे, यासाठी पुरातत्त्व खात्याच्या परवानगीने चार टप्प्यांत मंदिर विकासाची सुमारे ५८ कोटी रुपये खर्चाची विविध विकासकामे मंदिराच्या स्वनिधीतून हाती घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.
भाविकांना कमी वेळात मातेचे सुलभ दर्शन घेता यावे, यांसाठी मंदिर परिसर, मंदिरातील विविध परिवार देवदेवतांची मंदिरे, कार्यालयीन व प्रशासकीय इमारत, मुख्य प्रवेशद्वार, खुले प्रेक्षक प्रांगण, कपडे बदलण्याची जागा, निंबाळकर दरवाजावरील शेड, स्टोअर रूम, शाहू प्रांगणातील शेड आदी विकास कामांचा समावेश आहे.
तसेच कल्लोळ, गोमुख तीर्थ, सिद्धिविनायक मंदिर, निंबाळकर दरवाजा प्रवेशद्वार, मार्तंड ऋषी, टोळभैरव, दत्त, येमाई, जेजुरी खंडोबा, लक्ष्मी-नृसिंह मंदिर यासह दीपमाळ, शिवाजी दरवाजा शेजारील खोली, पाच पायऱ्या तसेच मंदिरातील फरशी बदलणे, संरक्षण भिंती बांधणे, कल्लोळ तीर्थाजवळीलपायऱ्या काढून नव्याने दुरुस्ती करून बसविल्या जाणार आहेत. एवढेच नव्हे तर सर्व मंदिरांना वॉटरप्रूफिंग करण्यात येणार आहे. या कामावर १० कोटी ५५ लाख रुपये खर्च होणार असून सर्व कामे पूर्ण होण्यास २ वर्षाचा कालावधी लागणार आहे.
अपंग, वृद्ध भाविकांसाठी लिफ्ट
मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या अपंग, वृद्ध भाविकांसाठी लिफ्ट तसेच रॅम्प करण्यात येणार आहे. ही कामे दोन टप्प्यांत होत असून सर्व कामे मुंबई, लातूर येथील कंपन्यांना देण्यात आली आहेत. कामे पुरातत्त्व खात्याच्या देखरेखीखाली होत आहेत.