सोलापूर : विधानसभा निवडणुकांचा निकाल नुकताच लागला आहे. यामध्ये महायुतीला दणदणीत यश प्राप्त झालं असून महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. अशातच मतदारसंघ सांगोल्याच्या तिरंगी लढतीत लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांना पराभवाचा धक्का बसला आहे. पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी शहाजीबापू पाटील यांच्याकडून चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलने जोरदार फटकेबाजी केली. ‘पराभवाने खचायला मी काय भिंत आहे की पूल?, आपला पराभव पहिल्यांदा थोडीच झालाय.’ असे शहाजीबापू म्हणताच कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला होता.
विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालात शिवसेना ठाकरे गटाचे दीपक आबा साळुंखे, शेकापचे बाबासाहेब देशमुख आणि शिंदेसेनेचे शहाजीबापू पाटील यांच्यात तिरंगी लढत झाली होती. शहाजीबापू पाटील यांना मतविभाजनाचा फटका बसल्याने त्यांचा पराभव झाला. पराभवानंतर शहाजीबापू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईला गेले होते. बुधवारी ते मुंबई येथून परत येताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत चिंतन बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी शहाजीबापू पाटील यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत तुफान फटकेबाजी केली.
पराभवामुळे खचायला मी काय भिंत आहे की पूल आहे?
पराभव काय पहिल्यांदा होत आहे का? असा सवाल उपस्थित करून पराभवामुळे खचायला मी काय भिंत आहे की पूल आहे? असे सांगत शहाजीबापू यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवला. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत इथे काय त्यांच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी नाही, तर मला पाडायला आले होते अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. मी भाषणात महायुतीला 200 पेक्षा जास्त जागा मिळणार म्हणून सांगत होतो आणि संजय राऊत आम्ही सत्तेत येणार अशी बडबड करीत होते. संजय राऊत कुणाकुणाला तुरुंगात टाकायचे याची यादी करून वाट बघत होते. ते स्वत: तुरुंगात जाऊन आलेत म्हणून इतरांनीही तुरुंगात जावे, असे त्यांना वाटते, असा टोला शहाजीबापूंनी लगावला आहे.
शिंदेसाहेब मला जबाबदारी देतील…
विधानसभा निवडणुकीत जरी पडलो असलो तरी एक वर्षाच्या आत सांगोल्याच्या १४ गावातील शेतात पाणी नाही आले, तर राजकीय संन्यास घेईल, अशी घोषणाही त्यांनी जाहीरपणे केली आहे. तसेच म्हणाले की, मी एक शिवसैनिक आहे, शिवसेना पक्षाच्या विस्ताराचे काम मी कालपासून सुरू केले आहे. एकनाथ शिंदे जो आदेश देतील, त्या आदेशाचे पालन करून माझी वाटचाल सुरू राहिल. या जिल्ह्याबरोबरच इतर जिल्ह्यात शिवसेना पक्ष कसा वाढेल, याचा प्रयत्न राहिल, असे शहाजी बापू पाटील यांनी सांगितले. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाचा शब्द दिला आहे का असे विचारल्यावर, एकनाथ शिंदे यांनी कोणताही शब्द दिला नाही, परंतु एकूण चर्चेतून शिंदेसाहेब मला जबाबदारी देतील. पद देऊन मला पक्षाच्या कामाला लावतील, असे शहाजीबापू यावेळी म्हणाले.