पुणे : राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला असून महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे तर महाविकास आघाडीच्या वाट्याला दारुण पराभव आला आहे. या निकालाच्या अनुषंगाने विरोधकांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केल्या आहेत. ‘अशातच निवडणूका हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला आहे’ असा आरोप कॉंग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे.
सत्ताधाऱ्यांकडून सरकारी पैसा निवडणुकीत लावला आणि प्रत्येक मतदारसंघात 50 कोटी वाटल्याचा गंभीर आरोप धंगेकर यांनी केला आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, गेल्या पाच वर्षात शिंदे सरकारने भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केला आहे. या भ्रष्टाचाराचे करोडो रुपये त्यांनी या विधानसभा निवडणुकीमध्ये वापरले आहेत. योजना हातात घेऊन शासनाचा पैसा निवडणूकीत वापरण्याचा प्रयत्न झाला आहे. प्रत्येक मतदारसंघात महायुतीने 50 कोटी रुपये निवडणुकीत वाटले असून हा सगळा पैसा टेंडरमार्फत गोळा केला गेला आहे. असंही धंगेकर म्हणाले.
आम्ही लाडकी बहिण योजना कायम ठेवू हे सांगण्यात कमी पडलो. मात्र सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे सूत्र महायुतीने वापरलं आहे. तसेच निवडणूकीत जातीय समिकरणंही वापरण्यात आली. जातीय समिकरणं, विषारी प्रचार, आणि योजनांचा वापर असाच होत राहिला तर सामाजिक कार्यकर्त्याला निवडणूकीत उतरणं अवघड आहे. काल निवडणूका झाल्या आणि आज आम्ही परत सेफ झालो. पुढच्या ५ वर्षांनी परत जातीय-धार्मिक राजकारण डोकं वर काढेल, असे गंभीर आरोप सत्ताधाऱ्यांवर रवींद्र धंगेकर यांनी केले आहेत.
कसबा मतदारसंघातील लढत..
कसबा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर विरुद्ध महायुतीचे हेमंत रासने अशी लढत झाली होती. यामध्ये हेमंत रासने यांनी धंगेकरांचा पराभव करत पोट निवडणुकीमधील आपल्या पराभवाचा वचपा काढला आहे.