नाशिक : विधानसभा निवडणुकीत पक्षाला कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची गरज असताना ऐन निवडणुकीत पक्षाशी बंडखोरी करणारे अनेक जण आता महायुतीचे सरकार बहुमताने सत्तेत आल्यानंतर ‘बँक टू पॅव्हेलियन’साठी सज्ज झाले आहेत. पक्षातील काही वरिष्ठ नेतेमंडळी देखील बंडखोरांना पक्षात घेण्यासाठी तयार आहेत. मात्र, आता बंडखोरांना पुन्हा पक्षात घेतल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा भाजपच्या नेत्यांनी दिला असून, आगामी काळात बंडखोर विरुद्ध एकनिष्ठ असा सामना पाहावयास मिळू शकतो. शहरातील विविध समस्यांसंदर्भात महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्या समस्या न सोडविल्यास आक्रमक भूमिका भाजपच्या वतीने घेण्यात आली.
त्यानंतर शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांना पक्षाच्या ज्येष्ठांनी थेट इशाराच दिला. आमदार अॅड. राहुल ढिकले यांच्यासह स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे, सभागृह नेते सतीश सोनवणे, अॅड. श्याम बडोदे, अरुण पवार, दिनकर आढाव, धनंजय माने, नाना शिलेदार आदी यावेळी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीची रेलचेल सुरू असतानाच भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
त्यानंतर स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते, माजी सभागृह नेते दिनकर पाटील, माजी नगरसेवक कमलेश बोडके, पल्लवी पाटील, इंदूमती नागरे, कामगार आघाडीचे विक्रम नागरे, अमोल पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर, जयश्री गरुड यांनी बंडखोरी केल्याने पक्षाने त्यांची हकालपट्टी केली. गिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून, तर दिनकर पाटील यांनी मनसेकडून निवडणूक लढवली, केदा आहेर व जयश्री गरुड यांनी अपक्ष निवडणूक लढवत पक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच आव्हान दिले. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात महायुतीला मोठा कौल मिळाल्याने आता बंडखोरी केलेल्यांपैकी अनेक जण घरवापसीसाठी प्रयत्न करू लागले आहेत.