छत्रपती संभाजीनगर: उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्याचा पारा घसरला आहे. किमान तापमान हंगामात प्रथमच ८ अंशांवर पोहोचले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी येथे हुडहुडी वाढली आहे. बुधवारी, २७ रोजी किमान तापमानात घट झाली आहे. नोव्हेंबरपर्यंत थंडीची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, मंगळवारी, २६ रोजी छत्रपती संभाजीनगरचे किमान तापमान २८.६, तर बुधवारचे २८.४ अंश सल्सिअस एवढे होते. हुडहुडी वाढल्यामुळे जनजीवन गारठले ‘असून, जागोजागी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. शहरात गारठा कमी असला तरी ग्रामीण भागात शेतीमालाला पाणी सुरू असल्यामुळे पैठण धरणाच्या पाणलोट क्षेत्रालगतच्या गावांमध्ये एक प्रकारे थंडीची जोरात लाट असल्यामुळे जागोजागी शेतकऱ्यांसह अनेकजण शेकोट्यावर शेक घेताना दिसून येत आहेत.
देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका तीव्र होऊ लागला आहे. परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठामध्ये राज्याचे यंदाच्या हंगामातील ८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान १३ अंशांपेक्षा खाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा घसरू लागला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या खाली आला आहे.
बुधवारी, २७ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या तासांमध्ये विविध ठिकाणी नोंदविले गेलेले कमाल २४ तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : छत्रपती संभाजीनगर २८.४ (१२.२), धाराशिव (१६), परभणी २८.५ (१२), परभणी कृषी विद्यापीठ २८.३ (८). मराठवाड्यात किमान तापमानात आणखी घट होत गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.