नवी दिल्ली: विद्यमान आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशातील आरोग्य सेवा क्षेत्राच्या महसुलात लक्षणीय वाढ झाली आहे. या कालावधीत आरोग्य सेवा क्षेत्राचा महसूल वार्षिक आधारावर १७.६ टक्क्यांनी वाढला असल्याचे अॅक्सिस सिक्युरिटीजच्या अहवालामध्ये म्हटले आहे.
आरोग्य सेवा क्षेत्राचा महसूल तिमाही आधारावर १०.४ टक्क्यांनी वाढला आहे. हॉस्पिटलच्या ऑक्युपसी दरात वाढ झाल्याचा फायदा या क्षेत्राला मिळाला आहे. याव्यतिरिक्त, हॉस्पिटल विभागातील एकूण उत्पन्नामध्ये ३३ टक्के योगदान विम्याचे असून त्यामध्ये २३ टक्के वार्षिक आणि तिमाही आधारावर १२ टक्के वाढ झाली आहे. पण तरीही विमा प्रवेश अजूनही कमी असल्याचे अहवालात म्हटले आहे. जागरूकता आणि क्रयशक्ती वाढल्याने या क्षेत्राच्या विस्ताराला वाव आहे.
आरोग्य सेवा क्षेत्रातील वाढता ऑक्युपसी दर आणि प्रति ऑक्युपाइड बेड सरासरी महसूल भविष्यात वाढतच राहील. विद्यमान आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत भारतीय फार्मा क्षेत्रातील मजबूत वाढ नोंदवण्यात आली आहे. भारतातील प्रमुख औषध कंपन्यांनी या काळात १० टक्के वार्षिक वाढ नोंदवली आहे. उत्तर अमेरिका आणि देशांतर्गत बाजारपेठेतील चांगल्या कामगिरीमुळे ही वाढ झाली आहे. देशातील फार्मास्युटिकल बाजारपेठेमध्ये वार्षिक ८ टक्के वाढ नोंदवली आहे. क्रॉनिक थेरपीजमध्ये ९ टक्क्यांनी वाढ झाली. तथापि, गंभीर उपचारामध्ये माफक ४ टक्के वाढ झाली, असे अहवालामध्ये म्हटले आहे.