लोणी काळभोर : पुणे वनविभागाने नायगाव पेठ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृत सुरु असलेल्या आरागिरणीवर बुधवारी (ता.27) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास छापा टाकला आहे. या छाप्यात वनविभागाने एकावर गुन्हा दाखल करून आरागिरणी मशीन जप्त केली आहे.
जावेद शेख (रा. रामटेकडी, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, नायगाव-पेठ ग्रामपंचायत हद्दीतील गट क्र 316 मध्ये लाकडे तोडण्याची मिल (आरागिरणी) आहे. ही आरागिरणी बेकायदेशीर असून आरोपी जावेद शेख हा रात्रीच्या वेळी लाकडे तोडत आहे. अशी माहिती वनविभागाला मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने, वनविभागाने सर्वात प्रथम जागेच्या तपासणीची परवानगी घेतली. त्यानंतर सदर ठिकाणी छापा टाकला. तेव्हा त्या ठिकाणी आरागिरणीवर अनधिकृत लाकडे तोडली जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पुणे वनविभागाने तेथून आरा यंत्र जप्त केले. तर आरोपी जावेद शेख याच्या विरोधात महाराष्ट्र वननियमावली 2014 नुसार वनगुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पुणे वनविभाग करीत आहेत.
सदरची कारवाई सहाय्यक वनसंरक्षक मंगेश ताठे यांच्या नेतृत्वाखाली व पुणे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोरचे वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर, वैभव बाबर, अशोक गायकवाड, अंकुश कचरे, अनिल राठोड, पांडुरंग भिकणे, पुजा कुबल, ऋतुजा कचरे, प्रिती नागने व वनपरिक्षेतील कर्मचाऱ्यांनी केली आहे.